इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

सावित्रीबाई फुले

 

 सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. ते नायगाव या गावचे पाटील होते. इसवीसन 1840 मध्ये सावित्रीबाईंचे लग्न जोतीरावांशी झाले. ज्योतिरावांचे पूर्वज सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील कडगुण गावचे गोरे फुलमाळी होते. लग्नानंतर सावित्रीबाईंनी मिसेस मीचेल यांनी चालवलेल्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. तीन ते चार वर्षांचा कोर्स सावित्रीबाईंनी पूर्ण केला. अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुण्यात बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेसाठी तात्यासाहेब भिडे यांनी मोफत जागा, दरमहा पाच रुपये, व प्रारंभिक खर्चासाठी 101 रुपये देणगी दिली होती. या शाळेत सावित्रीबाई शिक्षिका होत्या. या शाळेसाठी पालकांच्या भेटी घेऊन मुले मिळवण्याचे काम फुले पती-पत्नीने केले. समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा, अंधश्रद्धा दूर करावयाच्या असतील तर प्रथम स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजे हा विचार त्या दोघांनी स्त्रियांसमोर ठेवला. पुण्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा 1848 मध्ये काढली. 1848 ते 1852 पर्यंत फुले पती-पत्नीने पुणे शहर व सातारा परिसरात एकूण 18 शाळा काढल्या. फुले दांपत्याच्या या शैक्षणिक कार्यात विष्णूपंत वामनराव खराडकर, सुमनबाई क्षीरसागर, फातिमा शेख यांनी शिक्षक म्हणून काम करून सहकार्य केले. स्वतः सावित्रीबाईंचे अध्यापनाचे कार्य सर्वच दृष्ट्या उठावदार व गुणवत्तापूर्ण होते. अत्यंत चिकाटीने जिद्दीने फुले पती-पत्नीने शैक्षणिक कार्य केले. त्यांच्या कार्यास पुण्यातील सनातनी वृत्तीच्या लोकांनी विरोध केला होता. त्यांच्या अंगावर चिखलफेक केली पण सावित्रीबाईंनी अत्यंत धैर्याने, जिद्दीने, कळकळीने व कौशल्याने शिक्षिका म्हणून काम चालूच ठेवले. नोव्हेंबर 1852 मध्ये पुण्याच्या विश्रामबाग वाड्यासमोर ब्रिटिश सरकारने तीन हजार लोकांच्या उपस्थितीत फुले पती-पत्नीचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला होता.

          सावित्रीबाईंचे कार्य हे फक्त स्त्रीशिक्षणापुरते मर्यादित नव्हते तर शिक्षणाबरोबरच अस्पृश्यतेविरुद्ध ही त्यांनी कार्य केले. 1851 मध्ये त्यांनी महार वस्तीत स्वतंत्र शाळा काढली. अस्पृश्यांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून आपल्या घरातील पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला. त्यांच्यावतीने 1852 मध्ये पुण्याच्या कलेक्टरच्या पत्नी इस जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जातीच्या व धर्मांच्या स्त्रियांसाठी तीळगुळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सावित्रीबाईंच्या निमंत्रणास प्रतिसाद देऊन सर्व जातींच्या स्त्रिया या कार्यक्रमास  उपस्थित होत्या. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केले होती. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाज संपला अशी धारणा सनातनी लोकांची झाली होती. पण सावित्रीबाईंनी पतीच्या मृत्यूनंतर मोठ्या हिमतीने व निष्ठेने सत्यशोधक समाजाचे कार्य चालू ठेवले. आपला दत्तकपुत्र यशवंत याचा विवाह सत्यशोधक पद्धतीनुसार करण्यात सावित्रीबाई यांचा पुढाकार होता. त्यावेळी ज्योतिराव पक्षाघाताच्या आजाराने आजारी होते. 1876 मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला. या दुष्काळाची तीव्रता व भयानकता सावित्रीबाईंनी जे पत्र ज्योतिरावांना पाठवले होते त्यात दिसून येते. या दुष्काळात अंधार, अपंग, निराधार यांची मदत करण्यासाठी त्यांनी कॅम्प तीन वर्षे चालवला. काही स्त्रियांची मदत घेऊन, अन्न शिजवून ते दुष्काळग्रस्तांना पोहोचविले. स्त्रियांच्या केशवपनाविरुद्ध जो संप घडवून आणला त्याचे नेतृत्व नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेले असले तरी त्या संपाचे प्रेरणास्थान सावित्रीबाई होत्या. महात्मा फुले यांनी 25 डिसेंबर 1973 रोजी सिताराम अल्हाट व राधाबाई ग्‍यानोबा निंबाळकर यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह केला. राधाबाई निंबाळकर यांना वैचारिक व मानसिक आधार देण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. 1875 ते 1876 या तीन वर्षांच्या सत्यशोधक समाजाच्या रिपोर्टात मित्रपक्षांच्या वर्गणीदारांच्या यादित सावित्रीबाईंचे नाव आहे. त्यांनी देणगी दिल्याचा उल्लेख आहे. सत्यशोधक चळवळीच्या अनेक कामात सावित्रीबाई यांचा हात असल्याचे दिसते. सासवड येथे सत्यशोधक समाजाची 1893 मध्ये जी परिषद झाली त्याचे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषवले होते. तसेच त्यांनी 1896 च्या दुष्काळातही दुष्काळग्रस्तांना मदत केली होती. पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत त्यांनी लोकांची खूप सेवा केली.
         सावित्रीबाईंनी शैक्षणिक, सामाजिक कार्य करीत मौलिक स्वरूपाची साहित्यनिर्मिती केली. काव्यफुले, ज्योतिबांची भाषणे, सावित्रीबाईंची ज्योतिबास पत्रे, मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे, बावनकशी सुबोध रत्नाकर याप्रमाणे त्यांची साहित्य निर्मिती आपल्याला पाहायला मिळते. सावित्रीबाईंनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराबाई यांच्यावर काव्यरचना केली आहे. 'काव्यफुले' या काव्यसंग्रहात एकूण 41 कविता आहेत. त्यात निसर्ग विषयक, सामाजिक, बोधपर प्रार्थना आहेत. सावित्रीबाई या एका अर्थाने उपेक्षित कवयित्री होत्या. त्यांच्या कविता वांङमयीनदृष्ट्या समृद्ध असून त्यांना एक ऐतिहासिक महत्त्व आहे. 'ज्योतिबांची भाषणे' हे छोटे पुस्तक सावित्रीबाईंनी संपादित केले आहे. त्यात ज्योतिरावांची चार भाषण आहेत. सावित्रीबाईंची जोतिबास पत्रे' एकूण तीन असून ती नायगाव व ओतूरहून लिहिलेली आहेत. मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे या पुस्तकात उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसने, कर्ज या विषयावरील सावित्रीबाईंची भाषणे शास्त्री नारो बाबाजी महाघट पानसरे पाटील यांनी संपादित करून बडोदा येथून प्रकाशित केली आहेत. 'बावनकशी सुबोध रत्‍नाकर' या संग्रहात देशाचा इतिहास काव्यरुपाने सांगितला असून जोतीरावांच्या कार्याचे चित्रण त्यात आहे. यात 52 रचना आहेत. हे काव्य जोतीरावांच्या मृत्यूनंतर 1892 मध्ये प्रकाशित करण्यात आले. हे सर्व एकूण वांङमय 194 पृष्ठांच्या 'सावित्रीबाई फुले समग्र वांङमय' या ग्रंथात एकत्रित करण्यात आले आहे. त्याचे संपादन डॉ. मा. गो. माळी यांनी केले आहे. ग्रंथाला सुप्रसिद्ध तत्वज्ञ डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांची प्रस्तावना आहे. समाजातील सर्व घटकांनी त्यांचे स्वागत केले.
         3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकार 'बालिका दिन' म्हणून साजरा करते. पुणे विद्यापीठाचा नामविस्तार "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असा करण्यात आला आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال