इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

मुघल साम्राज्याच्या पतनाची कारणे

             मुगल साम्राज्याचा सर्वात जास्त विस्तार औरंगजेबाच्या शासनकाळात झाला. पण साम्राज्याच्या सीमा इतक्या दूरपर्यंत पसरल्या की त्यावर नियंत्रण ठेवणे दिवसेंदिवस जड जाऊ लागले. दळणवळणाच्या साधनांच्या अभावामुळे खुद्द औरंगजेबालाही ते जड गेले.  औरंगजेब शासक व मुत्सद्दी म्हणून अपयशी ठरला. सम्राट अकबराने सुरू उत्कृष्ट राजकीय धोरण, धार्मिक सहिष्णूता, उच्च पदांवर योग्य व्यक्तींची निवड इ. गोष्टी त्याच्या दोनही उत्तराधिका-यांनी पाळल्या. औरंगजेबने या धोरणाचा त्याग केला. त्याने पुन्हः धर्मांध नीतीचा अवलंब करून राज्य ईस्लामी बनविण्याचे प्रयत्न केले. संपूर्ण देशच इस्लाममय बनविणे त्याचे उद्दिष्ट होते. पण त्याचा हा प्रयोग त्याच्या अंगलट आला. धार्मिक कट्टरतेच्या धोरणामुळे औरंगजेबाला विविध स्तरातून विरोध सुरू झाला. शिख,
सतनामी, जाट, राजपूत, बुंदेले, मराठे यांनी मुगलांशी संघर्ष सुरू केला. त्याने हिंदूंवर पुन्हः जझिया लावला. हिंदूंना हत्ती, पालखी, वापरण्यास मनाई केली. त्यांच्या धार्मिक सणांवर, मेळ्यांवर, यात्रांवर प्रतिबंध लावले. मंदिरांचा विध्वंस करण्याचे आदेश निघाले. त्यामुळे हिंदू जनता व शासक संतप्त झाले. अनेक वर्षांपासून मुगल साम्राज्याचे समर्थक व संरक्षक असलेले वीर राजपूत आता औरंगजेबविरोधी बनले. मराठ्यांनी तर गनिमी काव्याचा अवलंब करून मुगल सैनीकांना हैराण करून सोडले. परिणामी विजेत्या मुगल सैन्याचे मनोबल समाप्त झाले. त्यांची श्रेष्ठत्वाची भावना लयास गेली व सैन्य निष्क्रिय बनले. अशाप्रकारे देशात सर्वदूर आपल्या स्वातंत्र्याच्या व धर्माच्या रक्षणाकरिता औरंगजेबविरुद्ध संघर्ष छेडण्यात आले. दक्षिण भारतातील वीजापूर, गोलकोंडा राज्ये शिया पंथाची असल्याने कट्टर सुन्नी असलेल्या औरंगजेबाच्या डोळ्यात खुपत होती. त्याने ही राज्ये जिंकण्याचे ठरवून आपली दक्षिण मोहीम सुरू केली. लवकरच बीजापूर व गोलकोंडा राज्ये मुगल साम्राज्याचा भाग बनली. खरे तर येथे औरंगजेब मुत्सद्दीपणात कमी पलला. कारण ही दोनही राज्ये म्हणजे मराठ्यांवर एक प्रकारे अंकूश होता. त्यांचे सतत परस्पर संघर्ष चालत. या राज्यांच्या पतनामुळे आता मराठयांना आपली पूर्ण ताकद मुगलांविरुद्ध वापरणे शक्य झाले.
            दक्षिण भारतातील औरंगजेबाचे विजयकार्य पावशतक  चालले. अर्थात ते यशस्वी ठरले नाही. मात्र ह्या प्रदीर्घ कालाकधीत मुगल साम्राज्याच्या साधनसामग्रीचे अतोनात नुकसान झाले. धनधान्य, सैन्य इ. चा भयानक नाश झाला. मुगल साम्राज्याचा कारभार एकतंत्री असल्याने सम्राटाच्या व्यक्तिमत्वाला विशेष महत्व होते. शासनाच्या ह्या प्रकारात सम्राट शक्तीशाली आहे तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालत असे पण सम्राट दुर्बल निपजल्यास शासनव्यवस्था नष्टभ्रष्ट होऊन साम्राज्याचे पतन होण्याचा धोका निर्माण होत असे. बाबरापासून ते औरंगजबपूर्यंतचे मुगल सम्राट शक्तीशाली व कुशल शासक असल्याने साम्राज्यावरील त्यांची पकड मजबूत राहिली. पण औरंगजेबनंतर मात्र परिस्थिती घसरू लागली. दुर्भाग्याने औरंगजेबनंतर दुर्बल सम्राटांची परंपरा सुरू झाली व साम्राज्य वेगाने पतनाकडे जाऊ लागले. अर्थात त्याला जबाबदार बऱ्याच अंशी औरंगजेब होता. स्वतःच्या संशयी वृत्तीने त्याने आपल्या मुलांना राज्यकर्ता म्हणून विकसित होऊ दिले नाही. आपल्या पूर्वजांच्या तुलनेत औरंगजेबाची मुले लष्करी व प्रशासकीय क्षमतेत अतिशय कमकुवत होती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मुअज्जम उर्फ शाह आलम उर्फ बहादुरशहा सम्राट बनला. त्यावेळी त्याचे वय ६२ वर्षे होते. विशाल मुगल साम्राज्याला सांभाळून ठेवण्याची त्याची कुवत नव्हती. अशा ह्या सम्राटांमुळेच सय्यद बंधूंची ताकद वाढून ते राजनिर्माता बनले व एक सत्ताबाह्य केंद्र निर्माण झाले. त्याच्यानंतर सम्राट बनलेल्या अहमदशाहच्या अशा सम्राटांचे प्रशासनाकडे दुर्लक्ष झाले.सम्राट बरोबरच अमीर-उमराव सरदार यांचे पतन झाले एक काळ असा होता की बहरामखाॅं, महाबतखाॅं, असफखाॅं यांच्यासारख्या मुगल सरदारांनी स्वतःच्या कर्तबगारीने, पराक्रमाने मुगल साम्राज्याचा विस्तार करून ते साम्राज्य सुदृढ बनविले. पण नंतरच्या काळात परिस्थिती विपरीत बनली. विस्तारकार्याकडे, प्रशासनाकडे त्यांचे अजिबात लक्ष राहिले नाही. हांजीहांजी करणाऱ्यांना महत्व प्राप्त झाले. त्यामुळे औरंगजेबनंतरच्या काळात योग्यतेचा, कर्तृत्वाचा लोप होऊन कोणत्याही महत्वाच्या लष्करी मोहिमा झाल्याचे दिसत नाही. अशा चारित्र्यहिन सरदारांमुळे साम्राज्याचे पतन अपरिहार्य होते. मुआसिर-उल- उमराच्या अध्ययनावरून इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात की, एखाद्या सरदाराच्या कार्याचे वर्णन
तीन पृष्ठांमध्ये होत असेल तर त्याच्या मुलाच्या कार्याची माहिती देण्यास एक पृष्ठ आणि नातवासाठी
केवळ काही ओळी-ज्यात सांगण्यासारखे काहीच नव्हते - अशी परिस्थिती निर्माण झाली. कर्तृत्वाची ही उतरत्या क्रमाची स्पर्धा साम्राज्याला हानीकारक ठरली.
           उत्तरकालीन मुगल सम्राटांच्या दुर्बलतेमुळे व अकार्यक्षमतेमुळे मुगल दरबारात सरदारांची गटबाजी उफालून वर आली. ह्या गटातील परस्पर हेव्यादाव्यांमुळे राजकीय क्षेत्रात अस्थिरतेचे व अशांततेचे वातावरण निर्माण झाले. मुगल दरबारात प्रामुख्याने तीन गट अस्तित्वात होते. मध्यआशियातील ऑक्झस नदीच्या उत्तरेकडील तुराण प्रदेशातून आलेल्यांचा तुराणी गट असून तो सुन्नीपंथाचा हेता. त्याचे नेत्त्व निजाम-उल-मुल्क, कमरूदीन इ. कडे होते. दुसरा गट ऑकझस नदीच्या दक्षिणेकडील इराण प्रदेशातून आलेल्यांचा इराणी गट असून तो शिया पंथीय होता. ह्या गटाचे नेते अमीरखाॅं, सादतखाँ इ. होते. तुराणी व इराणी हे दोन्ही गट विदेशी मुसलमानांचे असले तरी त्यांच्यात पंथाची भिन्नता व म्हणून राजकीय स्पर्धा होती. हया गटातील सैनिकही त्याच प्रदेशातून आलेले असत. ह्याशिवाय मुगल दरबारात हिंदुस्थानी मुसलमानांचा गट होता आणि त्याचे नेतृत्व सय्यद बंधूकडे होते. हिंदूचे समर्थन प्रामुख्याने ह्याच गटाला होते. विदेशी असलेल्या गटांचे परस्परांमधे वैमनस्य असले तरी हिंदुस्थानी मुसलमानांच्या गटाच्या विरोधात हे दोन्ही गट एकत्र येत. सम्राटाचे कान विरोधकांविरुद्ध भरणे प्रत्येक गटच करीत असे. त्यामुळे सर्वत्र अविश्वासाचे, परस्पर संशयाचे वातावरण होते. ह्या गटांमधे लहानमोठे संघर्षही चालत. पण प्रामुख्याने परस्पर ईर्ष्या इतकी
जबरदस्त होती की परकीय आक्रमणाच्या वेळीही त्यांची एकी होत नसे. उलट परकीयांना मदत करण्याची दुष्प्रवृत्ती निर्माण झाली. नादिरशहाच्या आक्रमणाच्या वेळी ही स्थिती प्रकर्षाने दिसून येते. नाही म्हणावयास ही सर्व परिस्थिती सांभाळून ठेवण्याची कुवत निजामात होती. पण त्याचे लक्ष दक्षिणेत असल्याने मुगल साम्राज्य सावरून धरण्यास निजामाचा काहीच उपयोग झाला नाही. भावाभावांमध्ये भांडणे होत, संघर्ष चालत आणि त्यात लष्करी अधिकारी भाग घेत. सत्तेसाठी स्वतः औरंगजेबाने आपला पिता शहाजहानला कैदेत टाकून दारा, शुजा व मुराद ह्या तीन भावांना ठार केले. हीच परंपरा पुढेही चालू राहिली पण ती वेगळ्या स्वरूपात दोषपूर्ण ठरली.
राजपुत्रांच्या जागी त्यांच्या समर्थकांमधे संघर्ष होऊ लागले, अनेकदा गटाऐवजी वैयक्तिक स्वार्थही समोर येऊ लागले. बहादुरशाहच्या मृत्यूनंतर १७१२ मध्ये राजनिर्माता म्हणून झुल्फिकारखाॅं समोर आला तर पुढे त्याची जागा सय्यद बंधूनी घेतली. १७१३ ते २० या काळात सय्यद बंधूची ताकद इतकी वाढली की त्यांच्यामुळे केवळ १७१९ ह्या एकाच वर्षात दिल्लीच्या सिंहासनाने चार मुगल सम्राट पाहिले. साम्राज्याचे पतन ह्यापेक्षा वेगळे कोणते? त्यानंतर निजाम व महंमद अमीनखाॅंने सय्यद बंधूवर मात करून त्यांना आपल्या मार्गातून कायमचे दूर केले. अशाप्रकारे वारसा हक्काचा नियम अस्तित्वात नसल्याने किंवा
दोषपूर्ण असल्याने देशाची राजकीय अवस्था वाईट झाली. त्याचा आर्थिक व्यवस्थेवर वाईट परिणाम झाला.
        मुगल साम्राज्याच्या पतनाचे महत्वाचे बाहय कारण कोणते असेल तर मराठ्यांचा झालेला उदय हे होय. स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना करणे शिवाजी महाराजांचे ध्येय होते. त्यासाठी शिवाजी महाराजांना विजापूर, गोवळकोंडा, पोर्तुगीज इत्यादी बरोबर मुगलांशीही प्रखर संघर्ष करावा लागला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे स्वतंत्र हिंदू राज्य नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलूनच
औरंगजेब दक्षिणेत आला. दुर्दैवाने संभाजी महाराज मारले गेले. पण त्यानंतर राजाराम महाराज व महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी गनिमी काव्याच्या सहाय्याने औरंगजेबाला जेरीस आणले. मुराठ्यांशी लढण्याच्या निमित्ताने औरंगजेब पूर्ण २३ वर्षे दक्षिणेत होता. त्याचे उत्तरेतील प्रशासनावर दुष्परिणाम झाले. अखेर औरंगजेबाला मराठा विरूद्ध विजय मिळू शकला नाही व त्यातच त्याचा १७०७ मध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर एका बाजूला मुगल साम्राज्य क्षीण होत गेले तर दुसऱ्या बाजुला पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठे अधिकाधिक शक्तीशाली बनत गेले. पेशवा थोरला बाजीरावने राज्यविस्ताराच्या धोरणाचा अवलंब केला आणि पहाता पहाता मुगलांचे माळवा, गुजरात इत्यादी प्रदेश जिंकले. पेशवा बाळाजी बाजीरावच्या कारकीर्दीत तर मराठा सत्ता संपूर्ण भारतात
पसरली. मराठा सत्तेचा प्रसार मुगल साम्राज्यातच होत असल्याने दिवसेंदिवस मुगल साम्राज्याचा संकोच होऊ लागला, पुढे तर दिल्लीच्या सम्राटाला त्याच्या गादीवर बसविण्याचे कार्य मराठयांनी केले. एकेकाळी मुगल सैन्य अत्यंत बलाढ्य होते. याच सैन्याच्या भरवशावर मुगल सम्राटांनी भारतात व भारताबाहेर ऑक्झस नदीपर्यंत प्रचंड विजयकार्य केले. परंतु मुगलांचे सैन्यसंघटन दोषपूर्ण होते. मनसबदारी प्रथेमुळे सैनिकांची भरती, बढती, वेतन ही सर्व कामे मनसबदारांची असल्याने सैनिकांची निष्ठा सम्राटाप्रती नसून मनसबदारांप्रती होती. जोपर्यंत मनसबदार सम्राटाला
एकनिष्ठ रहात तोपर्यंत ठीक होते. परंतु मनसबदार बंडखोर झाले त्यावेळी यादवी युद्धासारखी स्थिती निर्माण होई. बहरामखाॅं व महाबतखाॅं यांच्या बंडामुळे अशीच स्थिती साम्राज्यात निर्माण झाली. नंतरच्या काळात विशेषतः उत्तरकालीन मुगल सम्राटांच्या कारकीर्दीत मुगल सैन्यव्यवस्थेत अनेक दोष प्रकर्षाने दिसून आले. विलियम इर्विनच्या मतानुसार व्यक्तीगत शौर्याचा अपवाद वगळता मुगल सैन्यात अनेक दोष होते. मोहिमेवर जाताना मुगल सैन्याबरोबर हत्ती, ऊंट, बैलगाड्या इतर सामानसुमान,
मनोरंजनाची साधने, व्यापारी, दुकारदार इ. गोष्टीच जास्त प्रमाणात राहू लागल्या. सैनिकांपेक्षा असैनिकांचीच
संख्या जास्त राहू लागली. ऐश्वर्य आणि आळस सैनिकांच्या अंगी पुरेपूर भिनला होता. एखाद्या सशस्त्र टोळीसारखी मुगल सैन्याची अवस्था होती. मुगलांची सैन्यसंख्या प्रचंड असली तरी त्यात आधुनिक शस्त्रास्त्रांची कमतरता होती.
             मुगल शासन वास्तविक पोलीस शासन होते. अंतर्गत व बाह्य सुरक्षितता ठेवणे व कर गोळा करणे है शासनाचे मुख्य कार्य होते. मुगल साम्राज्याच्या पडत्या काळात झालेल्या दोन परकीय आक्रमकांनी साम्राज्याला प्राणांतिक धक्का दिला. अफगाणिस्थानचा शासक नादिरशहा याच्या १७३९ मधील आक्रमणाने दिल्ली सत्तेची मुळे जमिनीतून उखडल्या गेली. हे आक्रमण आर्थिकदृष्ट्या साम्राज्याला महागात पडले. शिवाय त्याचे राजकीय व लष्करी परिणाम महत्वाचे ठरले. नादिरशहाने दिल्लीची इतकी लूट केली की मुगल खजिना रिकामा झाला. मुगल सैन्याची दुर्बलता स्पष्ट झाली. शिवाय आतापर्यंत मुगल शब्दाला घाबरणारे आता डोके उचलून मुगल सत्तेची अवहेलना करू लागले. पुढे नादिरशहाला ठार करून
अहमदशहा अब्दाली अफगाणिस्थानचा शासक बनला. १७४८ पासून त्याची भारतावर आक्रमणे सुरू झाली.
अब्दालीच्या आक्रमणाची सतत टांगती तलवार मुगल साम्राज्यावर होती. त्याच्या ह्या स्वाऱ्यांनी अटकाव
करण्याची कुवत दिल्लीच्या सत्तेत नसल्याने मराठ्यांची मदत घेण्यात आली. प्रत्यक्षात १७६१ चे पानिपतचे तिसरे युद्ध अब्दाली व मराठे यांच्यात झाले. ते हताशपणे पहाण्याशिवाय तत्कालीन मुगल सम्राट शाहआलम द्वितीय काहीच करू शकत नव्हता. इतके मुगल साम्राज्य क्षीण बनले होते. एवढेच नव्हे तर युद्धप्रसंगी सम्राट दिल्लीहून निघून गेला. तो ११ वर्षे दिल्लीबाहेर होता. या १७६१ ते १७७२ या काळात दिल्लीवर नजीबखान रोहिल्याची सत्ता होती. १८ व्या शतकात मुगलांची केंद्रसत्ता दुर्बल होताच जागोजागीचे लष्करी अधिकारी शक्तीशाली बनू लागले. इंग्रज, फ्रेंच या युरोपीय व्यापारी कंपन्याही लष्करीदृष्ट्या
सुदृढ़ बनल्या आणि लवकरच त्यांनी भारतीय राजांवर सैन्यबळ व व्यापार याबाबतीत मात केली. युरोपात यावेळी पुनर्जागरणाचे, प्रबोधनाचे युग सुरू होते. ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान क्षेत्रात प्रचंड प्रगती होत होती. मुगल साम्राज्याच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन इंग्रजांनी बंगाल, बिहार,
ओरीसा प्रदेश मुगलांपासून जिंकून भारतात आपली सत्ता सुरु केली. सर यदुनाथ सरकारांनी म्हटल्याप्रमाणे
इंग्रजांचा मुगल साम्राज्यावर विजय म्हणजे युरोपियनांच्या आफ्रिका व आशिया खंडांवरील विजयाचा एक
छोटासा हिस्सा होय.

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال